IPL-2021 : बंगळुरूचा दिल्लीवर विजय

IPL-2021 : बंगळुरूचा दिल्लीवर विजय

अहमदाबाद । वृत्तसंस्था

एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूनें 5 बाद 171 धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची दमछाक उडाली. पण, दिल्ली कॅपिटल्सचे चार फलंदाज 47 धावांत माघारी परतले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत विजयाच्या नजीक होते, परंतु हिमरोन हेटमायरने घडी विस्कटवली. त्याने रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारीच केली नाही तर दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, अवघ्या एका धावेने त्यांना पराभव पत्करावा लागला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खानने चौथ्या षटकात विराट कोहलीला ( 12) आणि इशांत शर्माने पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( 17) माघारी पाठवले. अमित मिश्राने आरसीबीला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( 25) माघारी जाण्यास भाग पाडले. एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी आरसीबीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 38 धावांत 54 धावांची भागीदारी केली. पाटिदार 22 चेंडूंत 2 षटकार मारून 31 धावांवर माघारी परतला. एबीने 20व्या षटकात 23 धावा कुटल्या. तो 42 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांसह 75 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने 5 बाद 171 धावा केल्या.

प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर 23 धावा असताना शिखर धवन ( 6) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( 4) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला 28 धावांत दोन धक्के बसले होते. 7 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यासाठी पायचितची अपील केली अन् मैदानावरील अम्पायरनी त्याला बाद ठरवले. पण, रिषभने डीआरएस घेतला तेव्हा चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला लागला होता आणि त्यामुळे मैदानावरील अम्पायरना त्यांचा निर्णय बदलावा लागला. पण, खेळपट्टीवर तग धरून बसलेला पृथ्वी शॉ 8व्या षटकात माघारी परतला. हर्षल पटेलने आरसीबीला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. वाईड जाणारा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी 21 धावांवर बाद झाला.

मार्कस स्टॉयनिस व रिषभ यांनी फटकेबाजी करताना दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 34 चेंडूंत 45 धावा जोडल्या, परंतु हर्षलने 13व्या षटकात स्टॉयनिसला ( 22) माघारी पाठवले. इथून दिल्लीसाठी शिमरोन हेटमायर किंवा रिषभ यांच्याकडून एबी डिव्हिलियर्ससारख्या फटकेबाजीची अपेक्षा होती. 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलनें दिल्लीच्या हेटमायरचा झेल सोडला. अखेरच्या 24 चेंडूंत दिल्लीला विजयासाठी 56 धावा हव्या होत्या. 17व्या षटकात हेटमायरने 3 षटकारांसह 21 धावा चोपून धावा व चेंडूंचे अंतर 25-12 असे कमी केले. त्या 21 धावांमुळे कायले जेमिन्सनच्या नावावर चार षटकांत 32 धावा कुटल्या गेल्या.

हेटमायरने 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 19व्या षटकात 11 धावा आल्याने दिल्लीला अखेरच्या षटकात 14 धावांची गरज होती. हर्षल पटेलने 37 धावांत 2 विकेट्स घेतल्या. आता सर्व मदार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. सिराजने पहिल्या तीन चेंडूंत फक्त दोनच धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या अन् रिषभने अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या चेंडूवर नशीबाने दिल्लीला एक चौकार मिळाला अन् अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. पण, रिषभला चौकार मारता आला. शिमरोन 25 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 53 धावांवर नाबाद राहिला. रिषभ 48 चेंडूंत 58 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने 1 धावेने सामना गमावला. त्यांना 4 बाद 170 धावांवर समाधान मानावे लागले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com