Saturday, April 27, 2024
Homeजळगाववाळू तस्करीत पालकमंत्र्यांसह प्रशासकीय यंत्रणेचाही सहभाग

वाळू तस्करीत पालकमंत्र्यांसह प्रशासकीय यंत्रणेचाही सहभाग

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला वाळूच्या डंपरने धडक दिली होती. या घटनेनंतरही वाळु माफिया सर्रासपणे वाळूची अवैधरित्या तस्करी करीत आहे. दरम्यान वाळू माफियांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यात सुरू आहे. पालकमंत्र्यासह प्रशासकीय यंत्रणेचाही यात सहभाग असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवकर यांनी जिल्ह्यातील भ्रष्ट यंत्रणेवर बोट ठेवत सत्ताधार्‍यांवर सडकून टीका केली. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक होत आहे.

यासंदर्भात देवकर यांनी सांगितले की, जळगाव ग्रामीणमधील युवकांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून केले जात आहे. वाळू उपसा करणारी वाहने रस्त्यांवर भरधाव वेगाने जात असून, शनिवारी चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या वाहनालाही वाळूच्या डंपरनेच ठोकले असल्याचे देवकर म्हणाले.

तसेच आव्हाणे येथे देखील वाळूच्या ट्रॅक्टरने रिक्षाला ठोकल्यामुळे काही जण जखमी झाले होते. मात्र, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून याकडे लक्ष देणार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

देवकरांनी आरोप सिध्द करून दाखवावे- पालकमंत्री धरणगाव तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे माझे आहेत असे जर देवकर म्हणत असतील तर त्यांनी पोलीस यंत्रणेला तसे सांगावे. तसेच मी विरोधात असतांना शिंगाडे मोर्चा काढायचो. आता मात्र विरोधकांना साधे पुराण हातात घेता येत नाही ते शिंगाडे काय हातात घेतील. मुळात त्यांना विरोधी पक्षाची भूमिकाच येत नाही. शेतकरी हिताच्या गोष्टी करतांना जिल्हा बँकेत चेअरमन असतांना स्वत:च्या संस्थेसाठी 10 कोटीचे कर्ज कसे घेतले? याचा खुलासा करावा असे प्रत्युत्तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या