आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 : आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 : आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत ( National Food Security Campaign)वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा पर्यटन अधिकारी मधुमती सरदेसाई, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी जयंत गायकवाड यांच्यासह आहारतज्ज्ञ असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. हिमानी पुरी, कळसूबाई शेतकरी मिलेट उत्पादक गटाच्या संचालक नीलिमा जोरवर हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, तृणधान्य पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात यावे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा व समाजकल्याण विभागांतर्गत येणार्‍या आश्रमशाळा, वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहारात तृणधान्यांचा अधिकाधिक समावेश करण्यात यावा. पौष्टिक तृणधान्य वर्षाची विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी इतर विभागांनाही सहभागी करून घेण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजनअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शासनाकडून तयार करण्यात आलेला लोगो सर्व शासकीय कार्यालयांनी वापरात आणण्यासाठी कृषी विभागाने परिपत्रक काढावे. तसेच त्या लोगोचे स्टीकर्स तयार करून इतर विभागांनाही उपलब्ध करून द्यावेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय शाळांच्या आवारातील भिंती व दर्शक स्थळे निश्चित करून त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त घोषवाक्यांसह भित्तीचित्रे काढण्यात यावीत. जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने त्या भागात जनजागृती करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी सांगितले.

मिलेट फूड फेस्टिव्हल ( Millet Food Festival)

जिल्हा परिषदमार्फत बचतगटांच्या माध्यमातून 17 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मिलेट फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्याबाबत नियोजन सुरू आहे. त्या फेस्टिव्हलमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा अशा विविध तृणधान्यांपासून तयार केलेले 100 पेक्षा अधिक पदार्थ ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी दिली. बैठकीदरम्यान आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे विमोचन जिल्हाधिकारी व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com