५० लाख शेतकऱ्यांशी साधणार संवाद

jalgaon-digital
4 Min Read

मुंबई | प्रतिनिधी

लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत.

या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून या संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले असून राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी काँग्रेस नेते १० हजार गावातील ५० लाख शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या न्याय हक्काच्या या लढाईत शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.

महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. यापूर्वी २६ सप्टेंबर रोजीही ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. तर २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात आले होते.

या आंदोलनाचा पुढचा टप्प्यात गुरुवारी १५ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा कार्यक्रम राज्यातील सहा ठिकाणांहून एकाच वेळी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, वामशी चंद रेड्डी, आशिष दुआ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुसरा कार्यक्रम कोल्हापूर येथे होणार असून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम तिथे उपस्थित असणार आहेत.

औरंगाबाद येथील कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

तर अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत ,पुनवर्सन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होणार आहे. कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये LED Screen, LCD प्रोजेक्टर स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून या व्हर्चुअल सभांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या म्हणजेच INCMaharashtra च्या या फेसबुक, ट्वीटर युट्युब, वरून या शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *