आयएनएसव्ही तारिणी गोवा बंदरात

188 दिवस 17,000 सागरी मैल प्रवास
आयएनएसव्ही तारिणी गोवा बंदरात

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

'आयएनएसव्ही तारिणी'ने भारताच्या सागरी घडामोडींमधला आणखी एक महत्वाचा टप्पा साध्य केला. आयएनएसव्ही तारिणीने ऐतिहासिक प्रवास पूर्ण करत गोवा बंदरात प्रवेश करून, भारतीय किनार्‍याला स्पर्श केला. तारिणीने 188 दिवसांनंतर 17000 सागरी मैलाचा प्रवास करीत आंतर-महासागर, आंतरखंडीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेली आयएनएसव्ही तारिणी,आयएनएस मांडोवी नौकेसह सुरक्षित उभी करण्यात आली.

'आयएनएसव्ही तारिणी'ने सागरी प्रवास करणार्‍या सहा सदस्यांच्या चमूचे, गोव्याचे मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी स्वागत केले. व्हाईस अ‍ॅडमिरल आणि फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न नेव्हल कमांड, एमए हम्पीहोली, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कप्तान राणी रामपाल, आणि अनेक वरिष्ठ नौदल अधिकारी, नौदलाचे सदस्य आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी ‘नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनी’ च्या युवा आणि आश्वासक नौकानयनपटूंच्या नौकानयन कौशल्याच्या शानदार प्रदर्शनाने ‘फ्लॅग इन’ समारंभाला प्रारंभ झाला. यानंतर चेतक, कामोव्ह 31, हॉक्स, आयएल 38, डॉर्नियर आणि मिग 29के या विमानांचे, अतिशय कौशल्यपूर्ण उड्डाणसंचलन झाले.

याप्रसंगी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चालक दलाने दाखवलेले शौर्य, धैर्य आणि चिकाटीची प्रशंसा केली. कॅप्टन दिलीप दोंदे (निवृत्त), कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त)आणि सहा महिला नौदल अधिकार्‍यांच्या नाविका सागर परिक्रमा चमूने आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा प्राप्त केली आहे जी नारी शक्तीचे खरे प्रदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी तारिणी चालक दलाच्या कठीण अभियानाची प्रशंसा केली.संपूर्ण 188 दिवस आणि 17000 सागरी मैल अंतर पार करणा-या नौकानयनाचा भाग असलेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या दोन महिला अधिकार्‍यांची त्यांनी विशेष प्रशंसा केली. याप्रसंगी यांनी सांगितले की, अशा यशाची नोंद पुढच्या पिढीसाठी केली पाहिजे आणि तरुण मुला-मुलींना केवळ सशस्त्र दलात सामील होण्यासाठीच नाही तर अभिमानाने आणि सन्मानाने देशाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये या मोहिमेच्या माहितीचा प्रसार केला पाहिजे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com