सप्तशृंगीगडाचा विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश

सप्तशृंगीगडाचा विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड ( Saptshrungi Gad ) ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानावार आधारित विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse ) यांनी उपस्थित यंत्रणा अधिकार्‍यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी गड ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आराखडा, भाविकांची सुविधा याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भुसे म्हणाले की, श्री सप्तश्रृंगी तिर्थक्षेत्रास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असल्याने याठिकाणी यात्रेकरिता 20 ते 30 लाख भाविक येत असतात. भाविक व पर्यटक यांना अत्याधुनिक प्रकारच्या मुलभूत व पायाभूत सेवा सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वायातून नियोजनबद्ध आराखडा तयार करावा.

स्त्यांचेक्राँक्रीटीकरण करतांना भविष्यात ड्रेनेजलाईनची तोडफोड होणार नाही यादृष्टीने आताच तशी तरतूद करण्यात यावी. गडाच्या ठिकाणी डोम बांधतांना सर्व स्थानिकांची दुकाने एका रांगेत राहातील व हवा खेळती राहील व पावसाच्या दिवसांत पाण्यापासून संरक्षण होईल अशी रचना करण्यात यावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुसे यांनी दिल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमरे बसविण्यात येवून गडावरील 2 एकर जागेत स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापनेचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात यावा, असेही निर्देश पालकमंत्री भुसे यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.

लोकसहभागातून उपाययोजना कराव्यात

सप्तश्रृंगी गड तिर्थक्षेत्र विकासासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक पातळीवर सर्वेक्षणातून व लोकसहभागातून विकासाची स्थळे निश्चित करावीत व त्यादृष्टीने उपयायोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले महाराष्ट्रातील इतर विकसित तिर्थस्थळांच्या धर्तीवर सप्तश्रृंगी गड तिर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. सप्तश्रृंगी गड यथे सांडपाणी प्रकल्प तयार करतांना सांडपाणी मोकळे न सोडता प्रक्रियेद्वारे त्याचा ग्रामपंचायतीला पुनर्वापर करता येईल अशी व्यवस्था करावी.

निश्चित केलेल्या स्थळांवर 10-10 चे युनिट तयार करून ई-टॉयलेट, बायो-टॉयलेट निर्मिती व त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात यावी. मोकळ्या जागेत करण्यात येणार्‍या वृक्षारोपणांतून वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे. वीज व्यवस्था, पाणीपुरवठा, तिर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे गमे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उपस्थित अधिकार्‍यांना बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महिनाभरात नियोजनबद्ध व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com