जिल्हा बँक वाचवण्यासाठी शेतकरी समन्वय समितीचा पुढाकार
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ( NDCC Bank )वाचवण्यासाठी जिल्हा शेतकरी समन्वय समिती सरसावली आहे. आपली बँक वाचावी,यासाठी राज्य व केंद्र सरकारने जिल्हा बँकेच्या भागभांडवलामध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणुक करुन जिल्हा बँक सुरुळीत करावी, याकरता देशाचे सहकार मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे पाठ पुरावा करण्यासाठी नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री, आमदार, खासदार, यांच्याकडे माध्यमातून पत्र व्यवहार करुन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय समितीने बैठकीत घेतला आहे.
जिल्हा बँकेकडून बँक अडचणीत आल्याचे पुढे करत शेतकरी थकीत कर्जदारावर सरसकट जप्ती कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांची व शेतकर्यांची बैठक हुतात्मा स्मारकात झाली.यावेळी शेतकरी समन्वय समितीचे साहेबराव काका मोरे, राजू देसले, सुधाकर मोगल, दत्तुभाऊ बोडके, नाना बच्छाव, वैभव देशमुख, सचिन कड, राम निकम, सोमनाथ नागरे, संदीप मोरे, संजय पाटोळे, मनोहर देवरे प्रभाकर वायचले, पुंजाराम कडलग, समाधान बागल, शाम गोसावी आदी शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत सरसकट जप्ती कारवाईचा निषेध करण्यात आला. बँकने पहिल्या शंभर थकीत कर्जदार यांच्यावर कठोर कारवाई करुन वसुली करावी. तसेच जिल्हा बँकेला अडचणी आणणा-यास आजी माजी बँकेच्या संचालकांवर कठोर कारवाईसाठी बँकेने पाठपुरावा करावा तसेच जे प्रामाणिक व शेतीवरच अवलंबुन असणा-या थकीत कर्जबाजारी शेतक-यांची वसुली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकर्यांची शासनाने जबाबदारी घेऊन जिल्हा बँकेला 750 कोटींचे विशेष पॅकेज मिळवून दयावे. यासाठी येणा-या काळात जिल्हा समन्वय समितीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असेही बैठकीत निश्चित झाले. बैठकीनंतर, प्रशासक अरूण कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आले.
प्रशासक कदम यांचे आश्वासन
प्रशासक कदम यांनी समितीची भूमिका समजून घेतली व जे शेतकरी फक्त शेतीवर अवलंबुन आहेत त्यांचे इतर कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही, स्त्रोत नाही. अशा शेतकर्यांना जप्तीच्या कारवाई संदर्भात दिलासा देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बँक वाचवण्यासाठी शेतकर्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी व्यवस्थापक शैलेश पिंगळे उपस्थित होते.
समिती शेतकर्यांच्या पाठीशी
जिल्हा बॅकेची वसुलीसाठी प्रशासक कदम यांचे प्रमाणिक प्रयत्न सुरू आहे. बडया थकबाकीदारांकडून वसुलीसाठी बँकेने कडक पावली उचलावीत. लहान शेतक-यांना वसुलीसाठी त्रास देऊ नये. बँकेतील काही कर्मचारी प्रशासक कदम यांना त्रास देण्याच्या हेतून तक्रारी करत आहे. मात्र, शेतकरी तसेच जिल्हा शेतकरी समन्वय समिती त्यांच्या पाठींशी उभी आहे.
- राजू देसले, समन्वयक, जिल्हा बॅक वाचव, सहकार वाचवा