नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन पिढीला स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरूणांना प्रत्येक योजना आणि उपक्रमाची सविस्तर माहिती मिळू शकेल, असा उपक्रम प्रशासनामार्फत करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिककरांना चित्रफितीच्या माध्यमातून नव वर्षाच्या शुभेच्छा देत जिल्हाधिकारी मांढरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गत वर्षात करोना महामारीच्या रुपाने आलेल्या संकटाचा नागरिकांनी एकजुटीने सामना केला आहे. आता येणारे नवीन वर्ष आरोग्यदायी, आनंदाचे आणि तंत्र स्नेही लोकसेवेचे जाण्यासाठी आलेल्या संकटावर पूर्ण मात करून जिल्ह्याला नव्याने प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

सेवा हमी हक्क कायद्यांतंर्गत नाशिक जिल्ह्याने 100 सेवा अंतर्भुत करून साधारण साडेदहा लाख सेवा नागरिकांना पुरविण्यात आल्या आहेत. या कायद्यांतर्गत 101 सेवा पुरविणारा राज्यातील आपला एकमेव जिल्हा आहे. सरत्या वर्षात नाशिक जिल्ह्याला दिडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. पण करोना महामारीच्या संकटामुळे जिल्ह्याचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आपणास साजरे करता आले नाही.

नवीन वर्षात जिल्ह्याचा 151 व्या वर्षाचा महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिने आपल्या जिल्ह्याची शक्तीस्थळे जगासमोर आणण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्था, संघटना तसेच नागरिकांनी त्यांच्या सूचना कळविण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. करोना संकटावर सर्वांच्या प्रयत्नांनी मात करण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहे.

जिल्ह्यातील 11 हजार करोना बाधित रूग्णांची संख्या कमी होऊन आजच्या परिस्थितीत एक हजार 800 झाली आहे. येत्या काळात लसीकरणासाठीचे नियोजन देखील जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यापुढेही सर्व नागरिकांनी स्वत: सोबत इतरांचीही काळजी घेण्याच्या दृष्टिने कोरोना महामारीच्या अनुषंगाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर येणाऱ्या नवीन वर्षात या महामारीला आपण नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केला.