नाशिक । प्रतिनिधी

शहरातील नागरिकांनी बर्ड फ्लू आजाराला घाबरून न जाता काळजी घेतांना आपल्या जवळपास मृत पक्षी आढळल्यास त्यास स्पर्श न करता तत्काळ महापालिका पशुसंवर्धन विभागाला कळवावेत, असे आवाहंन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली आहे.

महानगरपालिकेकडुन बर्ड फ्ल्यू साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन वैद्यकिय विभागांची यंत्रणा कार्यरत केली असुन पहिल्या टप्प्यात जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना काही बाबीसंदर्भात आवाहन केले आहे. यात शहर व परिसरातील पोल्ट्री अथवा कुकुट्ट पालन करणार्यांनी त्यांच्या पक्षांमध्ये मरगळ आढळल्यास मनपाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून पशुसंवर्धन विभागास कळवावेत.

बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेतांना पक्ष्यांसोबत संपर्क टाळावा. तसेच पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवावीत. मांंस विक्रेत्यांनी शिल्लक उरलेल्या मासाची योग्य ती विल्हेवाट लावावी. आपल्या आजुबाजूला एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षांना उघड्या हाताने स्पर्श करू नये. त्याबाबतची माहिती मनपाच्या पशुसंवर्धन विभागास ताबडतोब कळवावी.

कच्च्या पोल्ट्री उत्पादना सोबत काम करताना संबंधीतांनी हात चांगल्या पाण्याचे व साबणाने वारंवार धुवूत व्यक्तिगत स्वच्छता राखावी. तसेच पोल्ट्रीचा परिसरही स्वच्छ ठेवावा. चिकन उत्पादनासोबत काम करताना व मास्क व ग्लोजचा वापर करावा. पूर्ण शिजवलेल्या ( 100 डिग्री सेल्सिअस)मांसांचाच खाण्यासाठी वापर करावा. आपल्या परिसरात असणार्या तलाव अथवा नदी नाल्यांमध्ये पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी पशुसंवर्धन विभागात कळविण्यात यावे. हे करत असताना नागरिकांनी कच्चे चिकन अथवा कच्ची अंडी खाऊ नये.

अर्धवट शिजलेले चिकन अथवा पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नये, आजारी दिसणार्या सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नये. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नये. एखाद्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास त्याबाबत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाला 0253 - 2317292 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून माहिती कळवावी. यानुसार मनपाचे पथक येऊन हा मृत पक्षी नियमानुसार ताब्यात घेऊन त्यांचे विश्लेषण करुन नंतर त्यांची विल्हेवाट केली जाणार आहे.