Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याNashik News : यंदा पोळ्याच्या सणावर महागाईचे सावट; सजावटीच्या वस्तूंच्या दरात 'इतक्या'...

Nashik News : यंदा पोळ्याच्या सणावर महागाईचे सावट; सजावटीच्या वस्तूंच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

नाशिक | मयूर जाधव | Nashik

पोळा (Pola) हा शेतकरी वर्गासासाठी अतिशय महत्वाचा सण मानला जातो. शेतकरी अतिशय आतुरतेने बैलपोळ्याची वाट बघत असतात. शहरामध्ये तसेच गावागावांत सजावटीचे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. शेतकऱ्यांसाठी तो वर्षभर शेतात राबत असतो. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. त्यानिमित्ताने बाजारात दुकाने लागण्यास सुरुवात झाली आहे. पंरतु, याच पोळ्याच्या सणावर यंदाच्या वर्षी महागाईचे सावट जाणवतांना दिसून येत आहे…

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर यंदाच्या वर्षी साहित्य विक्री करणाऱ्यांचीही कमतरता जाणवताना दिसत आहे. तर पोळ्यानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले असून यात चामड्याची माळ ,बैलगोंडा , घुंगरू यासह आदींचा समावेश आहे.

यंदा ऑगस्टमध्ये खंडित झालेल्या पावसामुळे पिकांची हलाखीची परिस्थिती होती. पावसाअभावी पिके करपल्याने उत्पादनात वाढ झालेली नाही. यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक परिस्थितीच संकट जाणवत आहे. दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणारे शेतकरी मागील वर्षीच्या सजावटीच्या वस्तू यंदाच्या वर्षी वापरात याव्या असा विचार करताना दिसत आहे.

शेतकऱ्यांसाठी बैलपोळ्याचे महत्व

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सर्वत्र पोळा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला ‘पिठोरी अमावस्या’ असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला शेती कामापासून आराम दिला जातो. बैलांची पूजा करून गोड धोड नैवद्य देऊन या दिवशी गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक देखील काढली जाते व ज्यांच्याकडे शेती नाही व ज्या शेतकऱ्यांकडे बैले नाहीत, असे शेतकरी मातीच्या बैलांची मनोभावे पूजा करतात. त्यांना गोड नैवद्य देखील दाखवतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बैलांच्या सजावटीच्या सर्व वस्तू आम्ही स्वतःच्या हाताने बनवून बाजारात विक्रीसाठी आणतो. २ महिने आधीपासून या सर्व वस्तू बनविण्याच्या कामास सुरुवात होते. घरी सगळ्यांचा मदतीने हे काम पूर्ण होण्यास मदत होते. व आठवडे आणि मोठ्या बाजारपेठेत याची विक्री केली जाते. शेतकरी वर्गात बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. परंतु अजूनही काही हौशी शेतकरी आहेत ते बैलांचा वापर करूनच शेती करतात. यंदाच्या वर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाचा पाहिजे तसा प्रतिसाद यंदा मिळताना दिसत नाही. तसेच निसर्गाची साथ राहिली तर यंदाच्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी शेतकरी नक्कीच चांगला प्रतिसाद देतील. एकंदरीत विचार केला तर सणाची व्यापकता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

अजिंक्य अहिरे, वनसगाव, निफाड

असे आहेत बैलांच्या सजावटीच्या साहित्यांचे दर

चामड्याची पैंजण : रु १५० ते ३००

बैलगोंडा : रु १५० ते ७५०

चाबूक : रु १०० ते २००

मोरकी : १२० ते १५०

कवड्याची माळ : रु ५०० ते ७००

बाशिंग : रु २५० ते ३००

शिंगांना लावण्यासाठी नैसर्गिक कलर रु ५० ते १००

बैलाची झालर : रु १५०० ते २०००

घुंगरू पट्टी : रु ३०० ते ३५०

घंटी माळ : ३०० ते ६००

- Advertisment -

ताज्या बातम्या