सोमवारपासून उद्योगांना मिळणार २० टक्के ऑक्सिजन

सोमवारपासून उद्योगांना मिळणार २० टक्के ऑक्सिजन

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटामुळे मागील दीड महिन्यापासून उद्योगांना खंडित केलेला आॅक्सिजन पुरवठा सोमवारपासून पूर्ववत केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० टक्के आॅक्सिजन उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारि सूरज मांढरे यांनी दिली. त्यामुळे उद्योगजगताला मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील काळात राज्यासह नाशकात करोना संकट हाताबाहेर गेले होते. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत नाशिक देशात पहिल्यास्थानी पोहचले होते. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एकवेळा ४८ हजारांवर जाऊन पोहचली होती. करोनाच्या दूसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या ७ हजाराच्या पुढे गेली होती.ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरचा तुटवडा निर्माण झाला.

परिणामी उत्पादीत ऑक्सिजनपेक्षाही अधिक ऑक्सिजनची गरज भासू लागली. जिल्ह्याची दिवसाची गरज १३५ मेट्रीक टन ऑक्सिजन असताना जेमतेम १०४ मेट्रीक टन इतका ऑक्सिजन उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे दक्षिणेतील राज्यातून रेल्वेने ऑक्सिजन आणण्याची वेळ आली होती. परंतू आता गत महिनाभरापासून रुग्णसंख्या घटू लागली आहे. त्यामुळेच आॅक्सिजनचीही गरज घटली.

परिणामी आता जिल्ह्यास ६० मेट्रीक टन पेक्षा कमी ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त ३० ते ४० मेट्रीक टन इतका ऑक्सिजन उपलब्ध होत शिल्लक राहात आहे. त्यामुळे आता हाच ऑक्सिजन उद्योगांना देण्यास काहीही हरकत नाही. त्यातच राज्य शासनाने एकूण उत्पादनाच्या २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना देण्यास परवानगी दिली आहे. अन् त्यानुसार सोमवारपासून आता उद्योगांना ऑक्सिजन दिला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com