
इंदूर | Indore
रामनवमीच्या दिवशी इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात असलेल्या बावडी (विहिर) चे छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटतेतील मृतांचा आकडा वाढला आहे.
या घटनेत ३५ भविकांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ नागरिक जखमी झाले आहेत. आणखी काही भाविक बेपत्ता असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लष्कराचे सुमारे ७५ लोक आले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात आहे. ही विहीर खूप जुनी आणि खोल असल्याने बचाव कार्याला वेळ लागत आहे. इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इंदूरचे जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ४-४ लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
नेमकं काय घडलं?
शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या स्नेह नगर येथील बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळचे सुमारे ११:५५ वाजले होते. रामजन्मोत्सवासंदर्भात मंदिरात हवन सुरू होते, मात्र लोक आपापल्या जागेवर पूजा करण्यासाठी उभे असताना मोठी दुर्घटना घडली. पायाखालची जमीनच सरकली. लोक सुमारे ५० फूट खोल खड्ड्यात पडले.
नंतर कळले की लोक ज्याला जमीन मानत होते, ती एका विहिरीचे छत होते. मंदिर प्रशासनाने जुनी विहीर न भरता त्यावर लिंटर टाकून झाकण लावले होते. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेण्यात आले. यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच लष्कराच्या जवानांची मदत घेण्यात आली.