
राजकोट | वृत्तसंस्था
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळण्यात आला.भारतीय संघाने श्रीलंकेवर ९१ धावांनी विजय मिळविला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला ईशान किशन व शुभमन गिल यांची जोडी फलंदाजीस आली. सामन्याच्या पहिल्याच षटकात दिलशानच्या गोलंदाजीवर धनंजय डीसिल्वाने ईशान किशनला झेल बाद केले. राहुल त्रिपाठीने आक्रमक खेळी करत १६ चेंडूत ३६ धावा केल्या. सामन्याच्या सहाव्या षटकात दिलशानने राहुल त्रिपाठीला झेल बाद केले. हसरंगाच्या गोलंदाजीवर शुभमन गिल बाद झाला.शुभमनने ३६ चेंडूत ४६ धावा केल्या.
सामन्याच्या सोळाव्या षटकात धनंजय डिसिल्वाने हार्दिक पंड्याला झेल बाद केले.हार्दिक पंड्याने ४ चेंडूत ४ धावा केल्या. दीपक हुड्डा ४ धावांवर हसरंगा कडून झेल बाद झाला.
सुर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. सुर्यकुमारने आजच्या सामन्यात ५१ चेंडूत ९ षटकार व ७ चौकार लगावत नाबाद ११२ धावा केल्या. २०व्या षटका अखेर भारतीय संघाने ५ गडी बाद २२८ धावा केल्या.
भारतीय संघाने दिलेल्या २२९ धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेच्या संघाकडून पाथूम निसंका व कुशल मेंडिस सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या ५व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उमराण मलिकने कुशल मेंडिसला झेलबाद करत श्रीलंकेच्या संघास पहिला धक्का दिला. शिवममावीने पी.निसंकाला झेल बाद करत १५ धावांवर माघारी पाठविले. अविश्का फर्नांडोला अवघ्या १ धावसंख्येवर अर्शदीप सिंघने झेल बाद करत तंबूत पाठविले.
दहाव्या षटकात युजवेंद्रच्या गोलंदाजीवर शिवम मावी ने चारिथ असलंकाला झेल बाद केले. चारिथ असलंकाने १४ चेंडूत १९ धावा केल्या. युजवेंद्रच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने धनंजय डिसिल्वाला झेलबाद केले. धनंजयने १४ चेंडूत २२ धावा केल्या. ह्सरंगाने ९ धावा तर करुणा रत्ने शून्यावर तंबूत परतले.
सतराव्या षटकात श्रीलंकेच्या संघाने सर्व गडी बाद १३७ धावा केल्या. भारतीय संघाने श्रीलंकेवर ९१ धावांनी विजय मिळवला.