नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढत आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

ओझर विमानतळावर शुक्रवारी (दि.१९)करोना कक्षात जिल्हयातील करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.ठाकरे म्हणाले , गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग करावे.गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिली.

करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंध व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी. नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

आपतकालीन व्यवस्था सज्ज : मांढरे

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्री चा प्रभावी अंमल सर्व यंत्रणा मिळून करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. तसेच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी मधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी मांडली.

वैदयकिय यंत्रणेचे बळकटीकरण : जाधव

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा नाशिक प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली. वैद्यकिय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहिम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची आदी माहिती सांगितली.

'मी जबाबदार’ भित्तीपत्रकांचे अनावरण

शासनाच्यावतीने ‘मी जबाबदार’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला पुढे घेवून जाण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून आज विशेष उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरिक प्रतिसाद देतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्ण वाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांच्याकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.