जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

जुलैमध्ये झालेल्या कोसळधार ( Heavy Rain in Month of July 2022 ) पावसाने गेल्या 80 वर्षांचा उच्चांक गाठला. 200 मिमी पाऊस एकच महिन्यात झाल्याने जिल्ह्यात सर्वच लहान- मोठे धरणे ( Dams)तुडुंब भरले असून नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सद्यस्थितीत 84% धरणसाठा झाला असून गेल्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी अवघा 51% पाणीसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचा ( Gangapur Dam )साठा 28 वरून 74 टक्कयांपर्यंत पोहचला आहे. गेल्या महिन्यात पावसाने जोरदार झोडपल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली. जिल्ह्यातील एकूणच सर्वच भागात पाऊस झाल्यानंतर पाणलोट क्षेत्रातही कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील 24 धरणापैकी 9 धरणे ओव्हरफ्लो झाली आहे.

गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड समूहातील वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणार्‍या गिरणा धरणातील पाणीसाठा आठवडाभरात 34 वरून 90 टक्कयांवर पोहचला आहे. तर एकूण उपयुक्त पाणीसाठाही 43 टक्कयांनी वाढून 84 टक्के झाला आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असला तरी जून महिन्यात पावसाचा जोर कमीच होता. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढू शकला नाही. याउलट पाण्याची मागणी अधिक असल्याने धरणांतील पाणीसाठा तळाला जात होता. अगदी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. परंतु जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने स्थानिक पातळीवरच पाण्याची उपलब्धता झाली आहे. याशिवाय हा पाऊस धरणांसाठीही फायदेशीर ठरला असून, त्यांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com