नाशिकमध्ये नेत्यांच्या दौर्‍यांत वाढ

मनपा निवडणुकीच्या तयारीला वेग
नाशिकमध्ये नेत्यांच्या दौर्‍यांत वाढ

नाशिक । फारूक पठाण

राजकीय पक्षांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक जणू प्रतिष्ठेची केल्याचे चित्र आतापासूनच पाहायला मिळत आहे. यामुळे की काय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षासह इतर लहान-मोठ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांचे नाशिक दौरे सुरू झाले आहेत. सध्या जवळपास सर्वच पक्षांची भाषा स्वबळाची असली तरी ऐनवेळी काय होते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ सतत नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे भुजबळ फार्म महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने गजबजू लागल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्याची धुरा सांभाळणार्‍या शिवसेनाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.

ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे खासदार संजय राऊत हे सतत नाशिक दौर्‍यावर येत आहेत. मागील सहा महिन्यात त्यांचे चार दौरे नाशिकमध्ये झाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी भाजपला मोठा धक्का देत दोन प्रदेश पदाधिकार्‍यांची घर वापसी करून घेतली. त्या नंतर शहराध्यक्ष बदलून महापालिका काबीज करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले.

मागच्या आठवड्यात देखील त्यांनी दोन दिवसांचा दौरा करून कार्यकर्ते, नेत्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्यांना भेटणार्‍यांच्या यादीत भाजप नेत्याची देखील नावे समोर आल्याची शहरभर चर्चा होती. भविष्यात पुन्हा संजय राऊत हे काही चमत्कार घडवून आणतील का, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

याच पाठोपाठ आता काँग्रेस पक्षाने देखील तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे.प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच येणार्‍या नाना पटोले यांच्या स्वागताची जय्यत तयारी पक्षपातळीवर सुरू आहे तर दुसरीकडे नाराज व इच्छुक यांनीदेखील आपआपल्या पद्धतीने नियोजन केल्याचे समजते. नाशिक हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. मात्र मागील काही वर्षात पक्षाला पूर्वीप्रमाणे दिवस राहिले नाहीत. यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ज्येष्ठ तसेच तरुण नेतृत्व यांची सांगड घालून पुढे जाण्याची मोठी कसरत वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे.

सध्या राज्यात सत्तेत भागीदारी असल्यामुळे पक्षात ऊर्जा असलीतरी नेते व कार्यकर्ते यांच्यात संंवाद कमीच असल्याचे जाणवते तर दुसरीकडे लोकांसाठी पक्षाच्यावतीने पाहिजे तसे कार्यक्रम राबविले जात नसल्यामुळे काही ज्येष्ठ नेते देखील सध्या नाराज आहेत. यामुळे आता नाना पटोले या सर्व परिस्थितीतून कसा मार्ग काढून पक्षाला उभारी देतात याकडे देखील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

या सर्व राजकीय वातावरणात महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्ष देखील मागे नाही. नाशिक महापालिकेची सत्ता पुन्हा आपल्याकडे राहावी यासाठी पक्ष पातळीवर मोठ्या प्रमाणात खलबते सुरू आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन पालकमंत्री असतानापासून आतापर्यंत नाशिक भाजपात त्यांचा शब्द’ अंतिम होता. मात्र मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता नाशिककडे लक्ष देतील अशी दबक्या आवाजात चर्चा होती. तर आता जयकुमार रावल हे नाशिकबाबत निर्णय घेतील अशी देखील नवीन चर्चा कानावर पडत आहे.

तर दुसरीकडे मध्य नाशिकच्या आमदार असलेल्या देवयानी फरांदे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यापासून त्यांनीही आपल्या विशेष कार्यशैलीतून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिक शहरातील चार पैकी तीन आमदार भाजपचेच आहे. महापौर सतीश कुलकर्णी देखील सतत शहर विकासाच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत आहेत. यामध्ये 300 कोटी रुपये कर्ज घेण्यापासून स्मार्ट सिटीकडून 100 कोटी रुपये परत घेण्याबाबत त्यांनी कडक भूमिका घेतली आहे. याप्रमाणे विविध लहान-मोठे पक्षांमध्ये नाशिक महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात विशेष नियोजन सुरू झाले आहे.यामुळे आगामी काळात नाशिक मध्ये आणखी जोमात राजकीय धुराळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक पुढे जाणार?

करोना संकटामुळे मागील सुमारे दीड वर्षापासून विविध निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर आता फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी नाशिक महापालिका निवडणूक देखील पुढे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तरी राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com