Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात पाणी टँकरच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात पाणी टँकरच्या संख्येत वाढ

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

राज्यात उन्हाचा उकाडा ( Heat Waves )मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने धरणांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्याचे बाष्पीभवनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे शहराला तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणसाठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घट होण्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 13 तारखेला सहा टँकर ( Water Tankers )होते; दि.29 रोजी जिल्ह्यात ही संख्खा 4 पटीने वाढत 25 झाली आहे. जिल्ह्यात आजमितीला अनेक आदिवासी गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन झाल्या नसल्याने तेथील नागरिकांना उन्हासोबतच पाणी टंचाईच्या झळा पोहचत आहे. पाण्याच्या नियोजन नसल्याचा फटका या लोकांना बसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक टँकर हे पालकमंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात आहे. आतापर्यंत 10 टँकर हे येवल्यासाठी आहेत. यामध्ये 17 गावांंचा आणि 6 वाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर 6 टँकर हे बागलाण तालुक्यात देण्यात आले असून त्यात 7 गावे आणि 2 वाड्यांचा समावेश आहे. सिन्नर, मालेगाव आणि पेठ येथे प्रत्येकी 2 तर इगतपुरी, देवळा आणि चांदवड या तालुक्यात प्रत्येकी 1 टंँकर आहेत.

दरम्यान, राज्यातील 118 गावे आणि 358 वाड्यांमध्ये पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. उत्तर महाराष्ट्रात अजूनही अनेक ठिकाणी जलपुरवठ्याच्या योजना प्रत्यक्षात आल्या नाही किंवा पाणी अडवून ते जिरवता आले नाही. मनमाड, चांदवडसारख्या शहरांत नळांना आठ-पंधरा दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने टँकरद्वारे पाणी मिळविण्याच्या पारंपरिक कृत्रिम उपायांवरच रहिवासी आपले समाधान मानत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या हर घर पाणी या योजनेची अमलबजावणी पूर्ण करण्यात नाशिक जिल्हा अपयशी ठरल्याचे चित्र देखील सद्य परिस्थितीमधून समोर आले आहे. वर्षानुवर्षे त्याच त्याच भागात तेच तेच पाण्याचे प्रश्न आणि त्याच त्याच प्रश्नाचे तेच तेच टँकरचे उत्तर असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात दिसत असल्याने नागरिक देखील पाणी टंचाईच्या झळा सोसत आहेत.

मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असलेल्या मनमाडमध्ये महिन्यातून एक दोनदाच नळांना पाणी येत असल्याने लोक अंत्यविधी अन् विवाहासारख्या कार्यक्रमांना गावी जाण्याचे धाडस करीत नाहीत. तर इगतपुरीसारख्या तालुक्याची धरणांचा तालुका अशी ओळख असताना देखील येथील काही गावांना धरण उशाशी आणि कोरड घशाशी, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व समूहांचा सरासरी उपयुक्त पाणीसाठा हा 40 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. हवामान खात्याने अजून पावसाचा अंदाज दिला नसला तरी जूनच्या मध्यापर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन प्रशासनाला करणे आवश्यक ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या