पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रूपयांचे निव़त्तीवेतन देण्यात येते. त्यात वाढ करून आता २० हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली.

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता कल्याण निधी तसेच अधिस्वीकृती समिती देखील नेमण्याचा शासन निर्णय लगेचच काढू, असेही शिंदे यांनी जाहीर केले. कोविड असो वा इतर कोणती आपत्ती असो, बॉम्बस्फोट असो वा दहशतवादी हल्ला असो पत्रकार हा कायम पुढे असतो. पत्रकारितेसोबतच तो सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत असतो. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे पत्रकारांसाठी विविध घोषणा केल्या. यावेळी महसूलमंत्री राधाक़ष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्त्ताविक वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी तर भूमिका कार्यवाह प्रविण पुरो यांनी विशद केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही काळात मोठया प्रमाणात बदल झाल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूर्वी प्रिंट मिडिया हा एकमेव होता. आता इलेक्ट्रॉनिक सोबत डिजिटल आणि सोशल मिडिया देखील आला आहे. आम्ही देखील पत्रकारांच्या भल्यासाठीच काम करतो. कोणी विरोधात बातमी दिली तर मी कधीही फोन करून विचारत नाही की विरोधात का बातमी दिली. पण जेव्हा सरकार चांगले काम करत असते तेव्हा चार शब्द जर चांगले लिहिले तर आमचाही हुरूप वाढतो. मेट्रोची कामे असतील. मुंबईचे सुशोभीकरण, खड्डे मुक्त मुंबई अशी अनेक कामे आम्ही करत आहोत. आमचा इतर काही अजेंडा नाही. सर्वसामान्यांना सुखाचे दिवस यावेत हाच आमचा अजेंडा आहे. कारण आम्ही देखील संघर्ष करूनच इथपर्यंत आलो आहोत, असे शिंदे म्हणाले. निवृत्त पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र भूषण द्या

संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आचार्य अत्रे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांना मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात यावा,अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी यावेळी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com