
लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
अतिपावसाने यंदा कांदा ( Onion) पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक फटका बसला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कांद्याच्या घसरलेल्या दराचा फटका बसलेल्या शेतकर्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Lasalgaon APMC ) कांद्याला कमाल 3260 रुपये प्रतिक्विंटल, किमान 1011 तर सरासरी 2550 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र पाच महिन्यांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अद्याप वेळ लागणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
जिल्ह्यात कांद्याने सरासरी 20 ते 25 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. मात्र अद्यापही शेतकर्यांचा खर्च वसूल झालेला नाही. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकर्यांनी कांद्याची साठवणूक केली होती.
बाजारात चांगला दर मिळाल्यावर विक्री करू असे शेतकर्यांना वाटले. पण इथेही नशिबाने साथ दिली नाही. मुसळधार पावसामुळे साठवलेला कांदा पाण्यात वाहून गेला. तसेच काही शेतकर्यांचा कांदा बराच काळ ठेवल्याने सडला. अशा स्थितीत त्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होते. लाखो शेतकरी कुटुंबे शेतीशी निगडीत आहेत. पण दुर्दैवाने गेल्या पाच महिन्यांच्या खर्चापेक्षा यंदा त्यांना खूपच कमी भाव मिळाला आहे.