या गावांमध्ये दहावी- बारावीचे वर्ग सुरु होणार?

शक्यता पडताळून पाहण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
या गावांमध्ये दहावी- बारावीचे वर्ग सुरु होणार?

मुंबई /प्रतिनिधी
जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का? याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च सरकारमार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्याची सूचना केली.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या १२ वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com