
मुंबई | Mumbai
राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणे म्हणजे अतिशय गांभीर्याचे आणि जबाबदारीचे काम, पण हीच जबाबदारी पार पाडत असताना मोठी चूक घडल्याची घटना राजस्थानमध्ये (Rajasthan) घडली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना मोठी चूक केल्याचे समोर आले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विधानसभेत अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली ; पण धक्कादायक बाब म्हणजे वाचत असलेला अर्थसंकल्प हा जुनाच असल्याचे निदर्शनास आले आहे.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पाची जी प्रत सोपवण्यात आली होती. त्यामध्ये काही पानांच्या प्रती जुन्याच होत्या, त्यानुसार ते जुनेच भाषण वाचू लागले होते. साधारण १० मिनिटे ते जुनाच अर्थसंकल्प वाचत असल्याचे लक्षात आल्यावर विरोधी पक्षातले (opposition party) आमदार जोरजोराने हसू लागले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. परिणामी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, अशोक गहलोत यांनी या चुकीसाठी सभागृहाची क्षमा मागितली. परंतु विरोधी पक्षातील नेत्यांनी सभागृहात गोंधळ निर्माण केला. राजस्थानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करताना सभागृहाचे (auditorium) कामकाज स्थगित करावे लागले.
बजेट ब्रीफकेसमध्ये (Budget briefcase) जुन्या अर्थसंकल्पाच्या प्रती आल्याने याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सरकारवर टीका होत आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.
या प्रकारानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ सुरू केल्यावर विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. अर्थसंकल्प सादर करतेवेळी झालेल्या इतक्या मोठ्या चुकीमुळे मुख्यमंत्री (CM) अशोक गहलोत अधिकाऱ्यांवर नाराज झाले आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिवांना बोलावले, त्यानंतर काहीच वेळात मुख्य सचिव उषा शर्मा (Usha Sharma) विधानसभेत दाखल झाल्या, मात्र पुढे काय झाले याविषयी अद्याप खुलासा करण्यात आला नसला तरी, या चुकीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.