
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय अटीतटीची होवून माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत 18 पैकी 11 जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन दिंडोरी बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. अटीतटीच्या या लढतीत झालेल्या निवडणूकीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा करिश्मा दिसून आला.
निवडणूकीत दुपारी चार वाजेपर्यंत 96.95 टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी उन्हात गर्दी केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान झाले तर दुपारी तीन वाजेपर्यंत 85 टक्के तर चार वाजेपर्यंत 96.95 टक्के मतदान झाले. दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी उत्कर्ष पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची लढत होती.
गेल्या 15 वर्षांच्या सत्तेला शेतकरी वर्ग कंटाळला होता, हे या निवडणूकीच्या निकालातून सिद्ध झाले. या निवडणूकीसाठी आमच्यावर विश्वास टाकत ग्रामपंचायत, सोसायटी गटातील सदस्य तसेच परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन बाजार समितीवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आश्वासनाची पुर्ती करुन बाजार समितीचा नावलौकीक वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाईल.
रामदास चारोस्कर, माजी आमदार