
नाशिक | फारूक पठाण
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नसतानाही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' पद्धतीने राज्यभर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचा फारसा परिणाम दिसून आला नसला तरी राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद लाभला होता, मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपवर टीका करणे काहीसे बंद केले होते.
पण, आता पुन्हा राज ठाकरे यांच्या टार्गेटवर भाजपा आहे. मागील दोन आठवड्यात राज ठाकरे यांनी विविध सभांमधून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसह विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये देखील जोष भरण्यात ठाकरे यशस्वी होताना दिसत आहे.
आगामी काही महिन्यांमध्ये देशातील लोकसभेसह राज्यात विधानसभा, मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मागे दिसत नाही. पक्षाच्या वतीने नुकतेच महाराष्ट्रात महासंपर्क अभियान सुरू केले असून पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र युवा नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी मोर्चा सांभाळला आहे.
ठिकठिकाणी तरुणांचा मोठा प्रतिसाद देखील या अभियानाला मिळत आहे. दरम्यान राज ठाकरे ज्याप्रमाणे विरोधी पक्षावर तुटून पडतात त्याच पद्धतीने आता अमित ठाकरे यांनी देखील राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेच्यावेळी अमित ठाकरे यांनी भाजपाला चिमटा काढला होता. आमदार फोडण्यात जर व्यस्त राहिले नसते तर ही दुर्घटना टाळली गेली असती, असे सांगितले होते.
यासोबतच, त्यांच्या वाहनांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर आडविण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी टोलनाक्यांवर तोडफोड केली होती. याबाबत अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना माझ्या वडिलांमुळे अर्थात राज ठाकरेंमुळे राज्यातील ६५ टोलनाके बंद झाले, तर माझ्यामुळे त्यात एकाची भर पडल्याचे त्यांनी सांगितले होते. अशा पद्धतीने अमित ठाकरे सतत राजकीय वक्तव्य करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचाही प्रयत्न करीत आहे.
या सगळ्याचा चांगला परिणाम दिसत असून राज्यात मनसेसाठी पोषक वातावरण ही निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपले भविष्य चांगले दिसत आहे. राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषदांना निवडणूक आपण स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केले नव्हते, मात्र केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध त्यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' च्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन भाजप विरोधी माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्माण सेना उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे आतापासूनच त्यांनी भाजपासह सर्व पक्षांवर टीका करायला सुरुवात केली आहे. विशेष करून सध्या राज ठाकरेंच्या टार्गेटवर भारतीय जनता पक्ष दिसत आहे. अमित ठाकरे यांच्यामुळे नाशिक मधील एका टोल नाक्यावर हल्ला करून तोडफोड झाल्यावर भाजपकडून तिखट प्रतिक्रिया आली होती.
महाराष्ट्र निर्माण सेनेने रस्ते तयार करून टोल नाके बांधायला शिकायला पाहिजे तोडफोड करून उपयोग होत नाही, असे भाजप कडून सांगण्यात आले होते. त्याचा समाचार घेताना राज ठाकरे यांनी भाजपने स्वतःचे आमदार निवडून आणावे दुसऱ्यांचे आमदार फोडू नये, असा टोला दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर हजारो कोटींचे आरोप केले व दुसऱ्या आठवड्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, याबद्दल देखील राज ठाकरे यांनी टिका केली होती. लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे करायचे असेल तर भाजपाला टार्गेट करण्याशिवाय पर्याय नाही असे, त्यांना वाटत असेल. त्यामुळे सध्या राज ठाकरेंच्या टार्गेटवर भाजप दिसत आहे.
'ती' चर्चा चर्चाच ठरली
सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच केलेली आहे. मात्र मध्यंतरी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रित येऊन भाजपाशी मुकाबला करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती, मात्र ती अखेर चर्चाच ठरली. आगामी निवडणुकांमध्ये राज्यात पक्षांची संख्या वाढल्यानुसार उमेदवारांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मोठ्या पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.