
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरलेला आणि नागपूरला मुंबईशी जोडणारा महामार्ग म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) होय. समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. शिवाय जलद प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळेची देखील मोठी बचत झाली आहे...
मात्र, या महामार्गावर १०० दिवसांत तब्बल ९०० अपघात (Accident) झाले असून आत्तापर्यंत ३४ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ही बाब अतिशय चिंताजनक ठरत असून आता हे अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सावंगी इंटरचेंज येथे समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक झाली. यामध्ये अतिवेगावर लक्ष ठेऊन अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांना किमान एक ते दोन तास समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
त्याबरोबरच वेगाने वाहन चालवणे, टायरमध्ये हवा नसलेल्या, शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना प्रथम रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारी छायचित्रे दाखवली जाणार असून एक प्रश्नपत्रिका सोडवून घेत, नियमात वाहन चालवण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे.
दरम्यान, या सर्व मार्गावर रस्ता सुरक्षा फलक लावले जाणार असून टोल नाक्यावर पीए सिस्टिम लावले जातील. तर ट्रक चालकांसाठी विश्रांती आणि पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर स्पीकरद्वारे विविध सूचना देण्यात येतील.