नवी दिल्ली :

मुंबई पोलीस आयुक्तपदावर उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजनाधी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकाचे सत्र सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही नुकतीच पवारांची भेट घेतली आहे.

संजय राऊतांचे मौन

दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी शिवसेना खासदार संजय राऊत संध्याकाळी पोहोचले. त्यांनी पवारांसोबत साधारण १५ मिनिटे चर्चा केली. त्यावेळी राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे. पवारांच्या भेटीसाठी जात असताना या प्रकरणावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. पवारांची भेट आटोपून राऊत निघाले त्यावेळीही त्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगले. राऊत यांची गाडी पवारांच्या निवासस्थानावरुन रवाना होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनीही माध्यमांशी बोलणे टाळले.

काँग्रेस नेते कमलनाथ यांचीही हजेरी

शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. अशावेळी काँग्रेसचीही मोठी बदनामी होत आहे. अशावेळी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कमलनाथ यांनी पवारांच्या निवासस्थानही होत असलेल्या बैठकीला हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.

दिलीप वळसे यांचे गृहमंत्रीपदासाठी नाव

अनिल देशमुख यांचा राजीनामाही घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या पदासाठी स्पर्धेत आले.