
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठे निर्णय घेतले असून यात नमो शेतकरी महासन्मान योजना आणि शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा अशा दोन योजनांचा समावेश आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती...
यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही ६ हजार रुपये निधी देणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण १२ हजारांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे अशाच शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
तसेच मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती. यासाठी अंदाजे ३,३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते.
याबरोबरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्यात आली. तर २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट अधिनियमात सुधारणा करणार बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
पिक विमा योजनेचा फायदा कुणाला?
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास आणि पीक काढणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान झाल्यास पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार येणार आहे.