राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती (Drought In Maharashtra) असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यात यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर, राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com