
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना २०२३ जाहीर करण्यात आली आहे. ही नवीन अभय योजना १ मे ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आली आहे.
कोणत्याही वर्षासाठी, व्यापाऱ्याची थकबाकी २ लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केली. या निर्णयाचा लाभ एक लाख लहान व्यापाऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही वैधानिक आदेशानुसार थकबाकी ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रक्कम माफ केली जाईल. सुमारे ८० हजार मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल.
हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने एटीएफ मूल्यवर्धित करात कपात केली आहे. हा कर यापूर्वी २५ टक्के होता, आता तो १८ टक्के करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावर (एटीएफ) हा कर आकारला जातो. मूल्यवर्धित कराचा दर आता १८ टक्के करुन हा कर बंगळुरु आणि गोव्याच्या समकक्ष आणला आहे.