
दे. कॅम्प । प्रतिनिधी Deolali Camp
शासकीय योजना ( Government Schemes ) फक्त कागदावर न राहता त्याची माहिती शहराबरोबरच गावखेड्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ तुमच्या दारी अशी मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी केले.
खा. गोडसे यांनी मागील आठवड्यात आयोजित केलेल्या खासदार रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी तेराशे बेरोजगारांना नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या पाठोपाठ आता खा. गोडसे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच आज जिल्ह्यातील सर्व महामंडळाच्या अधिकार्यांची बैठक खासदार यांचे कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अधिकार्यांना मार्गदर्शन करताना खा. गोडसे यांनी वरील आवाहन केले. बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मी ताठे, शिवाजी भोर, संपत काळे आदी उपस्थित होते.
महामंडळतंर्गत असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून स्वयंरोजगारांची निर्मिती करू पाहणारे छोटे व्यावसायिक आणि गरजू खूपच दूर असल्याची माहिती समोर येत आहे. शासन महामंडळांना हवा तितका निधी उपलब्ध करून देत असते. परंतु सदर निधीचा उपयोग गरजूंना होत नसल्याचे दिसते. महामंडळाकडून जाणारे कर्ज प्रकरण बँका मंजूर करत नाही, ही बाब समाजहिताची नाही. बँकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळ व बँकांचे प्रतिनिधींची संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, ओबीसी महामंडळाचे एस. जी. तायडे, खादी ग्रामउद्योग महामंडळाचे सुधीर केंदळे, वसंतराव नाईक महामंडळाचे प्रताप पवार, महिला आर्थिक महामंडळाचे संजय गायकवाड, युवराज उखाणे, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे मनोज शिंदे, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाच्या प्रीतम भावसार, एकात्मिक विकास प्रकल्प विभागाचे प्रशांत साळवे, केतन पवार, शबरी आदिवासी महामंडळाचे प्रशांत ब्राम्हणकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अविनाश गायकर, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे सुनील लोंढे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे रोहित काळे आदी अधिकारी उपस्थित होते.