हिम्मत असेल तर आमदारकीचे राजीनामे द्या- आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

बंडखोरांच्या धमक्यांना घाबरणार नाही
हिम्मत असेल तर आमदारकीचे राजीनामे द्या- आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आपल्याला राजकारण( Politics ) जमले नाही म्हणून गद्दारी झाली.आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले. ज्यांच्यावर अंधविश्वास ठेवला आणि त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, या सर्व गद्दारांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मैदानात या.शिवसैनिक( Shivsainik's) तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असा इशारा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे ( Shivsena Leader Aaditya Thackeray ) यांनी बंडखोर आमदारांना दिला.

नाशिक ( Nashik )येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी या बंडखोरांचा बंड किंवा उठाव नाही तर ही गद्दारीच होती असे सांगून जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आमदारांनी फक्त महाराष्ट्राशीच नाही तर माणुसकीशी गद्दारी केली आहे.

ज्यांना ज्यांना आपण स्वत:हून ओळख दिली ते आपल्याला धोका देऊन सोडून गेले, त्यांना आलिंगन दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला.ज्यांना दिले त्यांनी गद्दारी केली, ज्यांच्यावर अन्याय केला, ते निष्ठावान राहिले.मात्र शिवसेना हरलेली नाही, हरले आहेत ते ज्यांना खाऊन खाऊन अपचन झाले. ते आपले शिवसैनिक नाही.बंड करायचे होते तर महाराष्ट्रातच राहायचे होते.खासदारांच्या प्रचारासाठी आपण स्वतः नाशिकमध्ये आठ दिवस फिरलो होतो मात्र त्यांनीही या दगाबाजीत साथ दिली त्याचे दुःख आहे.

अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची कामे करत आलो. 24 तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलें नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिक जिल्ह्याची शिवसेना एकसंघ असून शिवसैनिक शिवसेनेसोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला. तिकीट मागण्यासाठी मागे फिरणारे आज गद्दार निघाल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मनोगत व्यक्त करताना तोडाफोडीच्या राजकारणात बंडखोरांनी शिवसैनिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यांचा समाचार घेताना घाबरवता कोणाला? हे शिवसेनेचे वाघ असल्याचे अधोरेखित केले.

यावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार वसंत गीते, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, अजय बोरस्ते, दत्ताजी गायकवाड, विलास शिंदे, विनायक पांडे, सुरेश पाटील, देवानंद बिरारी व शिवसेना शहर जिल्हा पदाधिकारी महिला पदाधिकारी व्यासपीठावर होते. यावेळी अनिरुद्ध शिंदे, बापू बागड, चंदू कासार, हसीना पठाण, शेफाली शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेत शिवबंधन हाती बांधले.

बंडखोरांच्या धमक्यांना घाबरणार नाही!

सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात पूर आला आहे. महाराष्ट्रातील लोक त्रस्त आहेत. काही लोक युवासेनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाब आणत आहेत. पण युवा सैनिक त्यांच्या धमकीला घाबरणार नाही. यावेळी त्यांनी उपस्थितांना आपण शिवसेनेसोबत आहात का?असे आवाहन केले. उपस्थित शिवसैनिक महिला व पुरुषांनी हात उंचावून पाठिंबा दर्शवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com