पालकमंत्र्यांनी माफी मागितल्यास दावा मागे घेऊ-आ.खडसे

आ.मंगेश चव्हाणांविरोधात दोन दिवसात गुन्हा दाखल करणार
पालकमंत्र्यांनी माफी मागितल्यास दावा मागे घेऊ-आ.खडसे

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

सन 2016 मध्ये आमदार एकनाथराव खडसे हे मंत्री असतांना विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. याप्रकरणी आमदार खडसेंनी (MLA Khadse) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरूध्द पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान पालकमंत्र्यांनी माफी मागितल्यास आपण खटला मागे घेऊ अशी माहिती आमदार खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये केलेल्या वक्तव्याविरोधात, खडसे यांनी न्यायालयात गुलाबराव पाटलांविरुध्द अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी सोमवारी न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी खडसे सोमवारी न्यायालयात आले होते. या प्रकरणी खडसेंनी पुरावे म्हणून काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तसेच या कागदपत्रांसंदर्भात न्यायालयात शपथपत्र देखील सादर केले. या खटल्याबाबत मागील आदेश तसेच ठेवून गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा खटला पुढे सुरू ठेवावा अशी विनंती न्यायालयात केली. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे नाव सोमवारी दोनवेळा न्यायालयाने पुकारण्यात आले. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीही कोर्टात हजर झाले नाही. त्यामुळे या खटल्याची मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

आ. चव्हाणांविरूध्द गुन्हा दाखल करणार

भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील कथित भ्रष्टाचार तसेच इतर कारणांवरून आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत खडसेंनी मंगेश चव्हाण यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com