आयसीसी टी -२० वर्ल्डकप : आज भारत विरुद्ध पाक हायहोल्टेज क्रिकेट सामना

आयसीसी टी -२० वर्ल्डकप : आज भारत विरुद्ध पाक हायहोल्टेज क्रिकेट सामना

नाशिक | सलिल परांजपे

ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता फेरीच्या सामन्यांचा थरार सुरु आहे. येत्या शनिवारपासून विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाचा सर्वात हायहोल्टेज सामना आज पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मेलबर्नच्या एमसीजी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता करण्यात येणार आहे. जगभरातून क्रिकेटचे सर्व चाहते या हायहोल्टेज सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा सामना २३ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. पण भारतीय संघाच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण सामन्याच्या दिवशी ६०% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे लाखो चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा आयसीसी टी २० वर्ल्डकप सामन्यांमध्ये कायमच वरचष्मा राहिला आहे. पण दुबई येथे गतवर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत करून पाकिस्तान संघाने नवीन इतिहास रचला होता. आता या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रथमच आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी जय्य्त तयारी सुरु केली आहे. मात्र भारतीय संघात गोलंदाजीत अनुभवाची कमतरता दिसून येत आहे . मोहंमद शमी , आणि भुवनेश्वर कुमारवर भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे. हर्षल पटेल आणि आर्षदिपसिंग यांच्यावर क्रिकेटप्रेमींचं आवर्जून लक्ष असणार आहे.

फलंदाजीत रोहित शर्मा , विराट कोहली , सूर्यकुमार यादव दिनेश कार्तिक , लोकेश राहुल , रिषभ पंत आहेत. रोहित शर्माची कामगिरी आशिया चषकात तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होऊन गेलेल्या टी २० मालिकेत साधारण राहिली आहे. तसेच लोकेश राहुल , दिनेश कार्तिक , हार्दिक पंड्या , सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी सातत्याने धावा करत आहेत.

पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाल्यास मोहंमद रिझवान आणि बाबर आझम भारतीय संघासाठी धोकादादायक ठरू शकतात. त्यांना लवकरात लवकर बाद करण्यासाठी रोहित शर्मा अँड कंपनी कशी रणनीती आखते ? यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. याशिवाय भारतीय संघाला आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये पराभूत करण्यात महत्वपूर्ण भूमिका असलेला शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीवर यशस्वी मात करून संघात दाखल झाल्यामुळे पाकिस्तान संघाला दिलासा मिळाला आहे.

या सामन्यात विराट कोहली , सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या , बाबर आझम हे स्टार प्लेअर्स ठरतील

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com