
नवी दिल्ली | सुरेखा टाकसाळ | New Delhi
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी भारतीय लोकशाहीबाबत इंग्लंडमध्ये केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविषयी सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. याबाबत, राहुल यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी देखील भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ होत आहे. या परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आपण भारत विरोधी वक्तव्य केलेले नाही, मला जे काही सांगायचे आहे ते मी उद्या संसदेच्या (Parliament) व्यासपीठावर सांगेन”, असे म्हणून इंग्लंड मधील त्यांच्या भाषणावर भारतात निर्माण झालेल्या गदारोळावर काही बोलण्याचे राहुल गांधी यांनी टाळले.
चार केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत आपल्यावर आरोप केले असल्याने ते प्रथम संसदेतच निवेदन करू इच्छितात. “मी खासदार आहे व संसदेत बोलण्याचा मला अधिकार आहे”, असेही राहुल गांधी म्हणाले.
संसदेत आपल्याला बोलू दिले जाईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. संसद अधिवेशनाचा उत्तरार्ध सुरू झाल्यापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अदानी व हिंडनबर्ग प्रकरणावर संसद गाजवली आहे.
तर राहुल गांधी यांनी इंग्लंड मधील त्यांच्या भाषणात देशातील लोकशाही (Democracy) व परकीय हस्तक्षेपाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) ने माफीची मागणी लावून धरली आहे. यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ सध्या सुरु असून राहुल गांधी काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.