मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही; नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा
USER

मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही; नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा

सिंधुदुर्ग | Sindhudurg

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली होती....

या टीकेवर पलटवार करताना राणेंनी अजित पवार अज्ञानी असल्याचा घणाघात केला आहे. अजित पवार हे अज्ञानी आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष द्यावे, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

जनआशीर्वाद यात्रेत (Jan Ashirwad Yatra) नारायण राणे आज कणकवलीत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. अजित पवार हे अज्ञानी आहेत. त्यांना केंद्रातील काही कळत नाही. त्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावे . ते फक्त आपल्यामागे लागलेल्या चौकशा आणि आरोप टाळण्यात हुशार आहेत, असे नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे पुढे म्हणाले की, राज्यात लघू उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी युवा उद्योजकांकडून अर्ज मागवून त्यांची छाननी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर महत्त्वाकांक्षी उद्योजकांना माझ्या खात्यामार्फत मार्गदर्शन दिले जाईल.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.

इतके दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय, असे नारायण राणे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) आदेशाचे पालन करत आम्ही जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. पण यात्रेत काही अपशकूनदेखील झाले. 'मांजर' आडवी गेली. पण मी काही त्याला महत्त्व दिले नाही. यात्रा आजदेखील मोठ्या उत्साहात सुरू आहे, असेदेखील राणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com