Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात अवकाळीने शेकडो जनावरांचा बळी; पिकांचेही नुकसान

जिल्ह्यात अवकाळीने शेकडो जनावरांचा बळी; पिकांचेही नुकसान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर परिसरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून आज दि.3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.या अवकाळीच्या तडाख्याने लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजाची झोप उडाली आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 866 जनावरे दगावली असून 21 कच्च्या घरांची पडझड झाली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील धाणेगाव, कुकाणे, तळवाडे येथील 219 मेंढ्या, 16 कोकरु, 12 शेळ्या, दोन गाय, 2 बैल, येवला तालुक्यातील भारम, सोमठाण देश, कुसूमवाडी,राजापूर, पिंपळखुटे येथील 48 मेंढ्या, नांदगाव तालुक्यातील ढेकू खुर्द, खादगाव, पोखरी, पानेवाडी येथील 39 मेंढ्या, 1 म्हैस, देवळा तालुक्यातील सावकी येथील 11 मेंढ्या, 4 कोकरु, बागलाण तालुक्यातील नामपूर , टेंभे, ताहराबाद,जायखेडा, मुल्हेर, विरगाव, किकवारी, डांगसौंदाणे, मुंजवाड, ब्राह्मणगाव या गावातील 296 मेंढ्या, 7 शेळ्या, 13 गायी, चांदवड तालुक्यातील तळेगावरोही, पिंपळनारे, कुंदलगाव, तिसगाव, वडाळीभोई, कोकणखेडे, चांदवड या गावातील 77 मेंढ्या, 2 शेळ्या, 1 गाय, त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या कांदा व द्राक्ष याचे नुकसान,

नाशिक तालुक्यातील आंबेबहुला, गिरणारे, डबडगाव, वडगाव या गावातील 66 मेंढ्या, 3 कोकरु, निफाड तालुक्यात 1328 हेक्टर द्राक्षे, कांदा, भाजीपाला या पिकांचे नुकसान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे, पिंपळद त्र्यं., देवगाव, वेळे, आडगाव येथील 8 घरांची किरकोळ पडझड , सुरगाणा तालुक्यातील सावरदरा, कुकुडमुंडा,वरंभे येथे 3 घरांची किरकोळ पडझड, पेठ तालुक्यात कोहोर, बेहेडमाळ, मोहपाडा, जांभुळमाळ येथे 8 घरांची किरकोळ पडझड, कळवण तालुक्यातील नांदुरी, बिजोर, भादवण , पिळकोस, देसराणे, येथे 27 मेंढ्या, 2 शेळ्या, 2 घरांची किरकोळ पडझड,

सिन्नर तालुक्यातील सिन्नर, नायगाव, पांढुर्ली, सोनांबे, देवपूर, वडांगळी, डुबेरे, वावी, नांदुर शिंगोटे, गोंदे, शहा, पांगरी बु.येथे 72 मेंढ्या, तर दिंडोरी तालुक्यातील शिंदवड, इंदोरे येथे 22 मेंढ्या दगावल्या आहेत. जिल्ह्यात पावसामुळे 877 मेंढ्या, 23 कोकरु,23 शेळ्या, 16 गायी, 3 वासरे, 1 म्हैस, व 2 बैल दगावले आहेत. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला आहे. भात शेती, गहू, टोमॅटोे, कारली, दोडकी व इतर शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

यात शेतकर्‍यांनी खर्च केलेले भांडवल निघण्याआधीच निसर्गाने त्यांच्या अपेक्षेवर जणू काही पाणीच फेरले आहे. आधीच दोन वर्षे करोना महामारीने शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. त्यातून कुठे सावरतो तोच पुन्हा अवकाळी पावसामुळे कर्जबाजारी होतो की काय असे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार करण्यात आला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 3 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. द्राक्ष बागाची कूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

द्राक्ष आणि कांदा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. द्राक्ष घडामध्ये क्रॅकिंग जाण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय चोवीस तास पाऊस सुरू राहिल्यास डाऊनी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्या काही बागा वाचणार आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध खर्च करावा लागणार असून अगोदरच वाढलेली मजुरी, औषधे व खतांचे वाढलेले दर यामुळे बेजार झालेल्या शेतकर्यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

‘जेवाद’ चक्रीवादळाचे सावट!

हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने मजेवादफ चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या