भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर ऐ मेरे वतन के लोगो... हे अजरामर झालेले गीत गायीले होते. त्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. आज कवी प्रदीप यांची जयंती. जाणून घेऊ या त्यांना ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सुचले कसे?

चल चल रे नौजवान, दूर हटो ऐ दुनियावालों, हिंदुस्तान हमारा है व ऐ मेरे वतन के लोगों या सारख्या गीतांमुळे कवी प्रदीप राष्ट्रकवी बनले. स्वातंत्रपुर्व काळात दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा या गीताने ब्रिटीशांच्या नाकात दम आणला होता. कवी प्रदीप यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत त्या काळात हिंदुस्थानवासींच्या मुखावर अल्पकाळातच लोकप्रिय झाले होते. या गीतामुळे त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले होते. यामुळे ते अनेक दिवस भुमीगत होते. पण तोपर्यंत हे गीत लाखो लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले होते. ७१ चित्रपटात कवी प्रदीप यांच्या रचना आहेत. त्यांनी एकूण १७०० कवीता लिहिल्या आहेत.

ऐ मेरे वतन के लोगो

कवी प्रदीप यांना ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. त्या ठिकाणी एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. आधी आशा भोसले हे गाणे गाणार होत्या, पण संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी ते लता मंगेशकरांना दिले.

पाकिस्तानात नकला

कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.