हॉटेल्स लवकरच सेवेत
मुख्य बातम्या

हॉटेल्स लवकरच सेवेत

नव्या कार्यपद्धतीवर काम सुरू : मुख्यमंत्री

Abhay Puntambekar

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरू होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरू आहे. ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मिशन बिगीन अगेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरू करण्याचा विचार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचार्‍यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.

मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या करोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. यासाठी हॉटेल व्यावसायिकांची दुहेरी जबाबदारी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही, मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

स्वयंशिस्तही महत्त्वाची : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरू करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. करोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे.

कामगारांच्या नोकर्‍या घालवू नका

संपूर्ण जगात सध्या करोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वार्‍यावर सोडू नये, कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच भलेही काहीकाळासाठी वेतनकपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकर्‍या घालवू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com