अवास्तव बिल आकारणार्‍या हॉस्पिटलला टाळे लावणार

महापौर कुलकर्णी यांचा इशारा
अवास्तव बिल आकारणार्‍या हॉस्पिटलला टाळे लावणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात मुंबई, पुण्यासारखी हॉस्पिटल असायला पाहिजे. त्याठिकाणी देण्यात येणार्‍या हॉस्पीटलच्या सेवांचा दर्जा शहरातील हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजे . वास्तववादी राहून त्यांनी रुग्णांची सेवा करावी आणि नियमाने असणारे बिल आकारावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू परंतु अवास्तव बिल आकारून रुग्णांची पिळवणूक करीत असाल तर निश्चितच अशा हॉस्पिटलला कुलूप लावण्याचे काम देखील मनपाच्या माध्यमातून करण्यात येईल, असा इशारा महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिला.

चार दिवसापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये झालेल्या अर्धनग्न आंदोलनानंतर हा विषय चर्चिला जात आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी देखील चौकशीचे आदेश दिले असून आज भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने याबाबत चर्चा करून महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. महापौर कुलकर्णी यांच्यासह आ. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी नाशिक महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सोनकांळे, व्होकार्ट हॉस्पिटलसाठी नियुक्त असलेले लेखापरिक्षक तसेच व्होकार्ट हॉस्पिटलचे संचालक प्रतिनिधी याचे समवेत चर्चा करुन माहिती जाणुन घेतली व याबाबतीत तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले.

तक्रारी असल्यास निश्चितच संंधित हॉस्पिटलवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. याच अनुषंंगाने मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. लेखापरीक्षण विभागामार्फत हॉस्पिटलमधील रुग्णांंच्या बिलांंची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये असलेले व हॉस्पिटलला लागून असलेल्या मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बिलांची आकारणी केली जाते त्यावरही नियंत्रण असणे गरजेचे असून याबाबतीत फार्मसी महाविद्यालयाची मदत घेऊन अशा स्वरूपाच्या बिलांवर कंट्रोल आणावा व फुड अ‍ॅन्ड ड्रग्ज् यांच्या मार्फतही नियंत्रण आणून रुग्णांना देण्यात येणार्‍या बिलांची तपासणी करावी, याबाबतीत चर्चा करण्यात आली.

12 लेखाधिकार्‍यांंची नेमणूक

सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलला बिल तपासणीसाठी नियुक्त लेखापरिक्षण कर्मचारी यांंच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या इतर विभागातून 12 लेखाधिकार्‍यांंची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. याबाबतीत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य लेखापरिक्षकासह तीन सदस्यीय समिती नव्याने गठीत करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली.

रामायणवर हेल्पलाईन

नागरिकांनी महानगरपालिकेच्या हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवावी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी येत्या दोन-तीन दिवसात महापौर यांचे निवासस्थान रामायण येथे नव्याने यंत्रणा उभारण्यात येऊन हेल्पलाइन सेंटर सुरू करणार असून त्यावर नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, तक्रारीची दखल तातडीने घेण्यात येईल, असे महापौर सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com