ग्रामीण भागातील रुग्णालये रेड क्रॉसकडे देणार: आरोग्य मंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई। वृत्तसंस्था

राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था अथवा रेड क्रॉस सोसायटीकडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

व्यवस्थापनामध्ये बदल केल्यास चांगले परिणाम होतात याचे महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे उदाहरण म्हणता येईल. खूप प्रयत्न करूनही आरोग्यसेवा पोहोचविणे कठीण जाते. त्यामुळे अलीकडे राज्य शासनाने येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर रुग्णालयाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहेत.

मानांकनात महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा वरचा क्रमांक आहे. नवीन व्यवस्थापनाने राज्य शासनाच्या माता संगोपनसारख्या अनेक योजना प्रभावी राबविल्या. उत्तम कामगिरीच्या जोरावर या रुग्णालयाने जिल्ह्यात वरचा क्रमांक प्राप्त केला, अशी माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली.

राज्यात आधुनिक सुविधा असलेल्या 102 क्रमांकाच्या पाचशे रुग्णवाहिका नव्याने घेणार आहे. महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने सर्व स्तरातील पर्यटक येत असल्याने महाबळेश्वरला रुग्णवाहिका पुरविली जाईल. व्यवस्थापन बदलले तरी या या सेवाभावी संस्था व रेड क्रॉस सोसायटी यांच्या कर्मचार्‍यांचे पगार, रुग्णांसाठी औषधे, विज बिल व इतर खर्च हा राज्य शासनाकडून दिला जातो. ही रक्कम महिन्याच्या पहिल्या तारखेला कशी मिळेल त्याची व्यवस्था केली जाईल, असेंही ते म्हणाले.

ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे परंतु तेथील अतिदक्षता विभाग सुरू नाही त्या ठिकाणचा अतिदक्षता विभाग सुरू करावा व त्यासाठी बिल आकारण्याची परवानगी संस्थांना देण्याचा विचार आहे. प्रशासन व ग्रामीण रुग्णालय यांच्यात केवळ एका वर्षाचा करार केला जातो पुढील पाच वर्षासाठी हे रुग्णालय रेड क्रॉस सोसायटी व संस्थेकडेच राहणार असल्याचेंही त्यांनी सांगितलें.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com