एकनाथ शिंदेंचे आरोप; गृहमंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंचे आरोप; गृहमंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही वेळापूर्वी 'राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे' असे ट्विट केले होते. त्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रालयाकडून (Home Department) हा दावा खोडून काढण्यात आला असून कोणत्याही आमदाराचे (mla) संरक्षण काढले नसल्याचे म्हटले आहे...

याबाबत गृहविभागाने ट्वीट करत म्हटले आहे की, “राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत”, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर राज्यातील शिवसैनिकांची वाढती नाराजी आणि त्यांच्या कार्यालयाची होणारी तोडफोड पाहता कुटुंबांला संरक्षण देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश गृहविभागाने पोलिसांना (police) दिले आहेत.

तसेच यासंदर्भात बोलतांना गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, "विधानसभा सदस्य किंवा खासदार यांना सुरक्षा स्थानिक पातळीवर असते. ती सुरक्षा जिल्हा किंवा राज्यापुरती असते. त्यामुळे कोणाची सुरक्षा काढली नाही उलट त्यांच्या कुटुंबाला आम्ही सुरक्षा दिली आहे. पोलीस दल अलर्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखावी याबाबात मी आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेनी केला होता हा आरोप

एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून ३८ आमदारांची यादी असलेलं पत्र शेअर केलं आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस विभागाला पाठवलं असून या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com