अतिवृष्टीचा फटका; जिल्ह्यात 'इतक्या' हेक्टरवरील पिकांची हानी

अनुदानाची मागणी
अतिवृष्टीचा फटका; जिल्ह्यात 'इतक्या' हेक्टरवरील पिकांची हानी

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्ह्यात वादळी वारे, अतिवृष्टी, सततच्या धुव्वाधार पावसाचा( Heavy Rain ) फटका शेतीला बसला असून जिल्ह्यातील 21,628 शेतकर्‍यांच्या 10 हजार 92 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये सोयाबीनसह मका, भात व कांदा पिकालाही फटका बसला आहे.जिल्ह्याच्या विविध भागात कुठे मध्यम, जोरदार तर कुठे अतिजोरदार पाऊस जुलैपासून सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडल्यापासून तर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे.

अनेक तालुक्यांमध्ये सरासरीहून खूपच अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी शेतच वाहून गेल्याच्या घटना घडल्या. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहिले. पिकांवरही हा पाऊस तुटून पडल्याने शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

जून ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत जिल्ह्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टी,वादळी वारे,गारपीट व सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील जिरायत, बागायती व फळपिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यामध्ये जून महिन्यात झालेल्या वादळी वार्‍यामुळे नांदगाव व देवळा तालुक्यातील 63 शेतकर्‍यांच्या 15.5 हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला.या वादळवार्‍यापाठोपाठ जुलै महिन्यात काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली.याचा फटका सटाणा,कळवण,देवळा,दिंडोरी,सुरगाणा, नाशिक, त्रंबकेश्वर आणि निफाड या तालुक्यातील 4755 शेतकर्‍यांच्या 119 हेक्टर वरील पिकांना बसला.

यानंतर ऑगस्ट महिन्यामध्येही मालेगाव, सटाणा,दिंडोरी या तालुक्यातील 13,682 शेतकर्‍यांच्या 6792 हेक्टर वरील पिकांना फटका बसला.वादळीवारे अतिवृष्टी या पाठोपाठ निसर्गाचे दुष्टचक्र जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर सुरूच राहिले. ऑगस्ट महिन्यात तर सततच्या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील विविध भागात कमी अधिक प्रमाणात शेतकर्‍यांना बसत आहे.यामध्ये सर्वाधिक फटका येवला तालुक्याला या पाठोपाठ सटाणा तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला.या दोन तालुक्यातील 3128 शेतकर्‍यांच्या 286 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला.जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात वादळी वारे,अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे 21,628 शेतकर्‍यांच्या दहा हजार 92 हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला आहे.

संततधारेने 2086 हेक्टर क्षेत्र बाधित

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात विविध तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 7992 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचा फटका 7700 हेक्टरवरील जिरायती पिकाला बसला आहे.यामुळे या भागातील 18 हजार 437 शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सटाणा तालुक्यातील 50 तर येवला तालुक्यातील तीन हजार 78 अशा एकूण 3128 शेतकर्‍यांच्या 2055 हेक्टर जिरायती पिकाला तर वीस हेक्टर बागायती क्षेत्रातील पिकाला फटका बसला आहे.

तीन महिन्यांत दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधित

तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 9825 हेक्टर जिरायत क्षेत्राला,202 हेक्टर बागायती क्षेत्राला तर 63 हेक्टर फळ पिकांना अशा एकूण 10 हजार 91 हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे

सात कोटी सहाय्य अनुदान गरजेचे

अतिवृष्टी,सततचा पाऊस यामुळे जिल्ह्याला सात कोटी सहाय्यक अनुदान मिळणे गरजेचे आहे. याबाबतचा मागणीचा प्रस्ताव कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.यामध्ये जिरायती क्षेत्र 6800 रुपये प्रति हेक्टर,बागायती क्षेत्र 13 हजार 500 प्रती हेक्टर तर फळबागांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर इतक्या प्रमाणात सहाय्यक अनुदानाची मागणी कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे.

बाधित शेतकरी

सटाणा-50, कळवण-3119, देवळा- 70, दिंडोरी-363, सुरगाणा -195, नाशिक-19, त्र्यंबकेश्वर -2, निफाड- 937, मालेगाव- 12362, सटाणा-1271, दिंडोरी-19.

टोमॅटोवरील खर्च पाण्यात

साधारण दीड लाख रुपये खर्चून दीड एकरमध्ये टोमॅटो लावले होते. यावर्षी सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचून पूर्ण टोमॅटो वाया गेला आहे.

- अनिल काकड, शेतकरी, मखमलाबाद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com