नाशिक ।

समृद्धी महामार्गचे काम विदर्भात जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु शासकीय गोंधळाची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. महामार्ग तयार झाला आहे, परंतु शेतकर्यास मोबदला मिळाला नाहीच परंतु आश्चर्य म्हणजे सातबारा अजूनही शेतकर्याच्या नावावर आहे.

शिंदखेडाराजा तालुक्यातील वर्दडी (जि.बुलढाणा) गावातील शेतकरी डिगंबर शंकर मोरे यांची गट क्रमांक 58 मध्ये शेती आहे. या शेतातून समृद्धी महामार्ग जातो. फेबु्रवारी 2017 मध्ये शेतात मोजणी झाली त्यावेळी शेतमालक वेगळाच दाखवला गेला. मधुकर शंकर मोरे हे या शेताचे मालक असल्याचा अहवाल दिला गेला होता. ही चूक दुरुस्तीसाठी अनेक वेळा अर्ज केल्यावर जून 2018 मध्ये डिगंबर शंकर मोरे यांच्या नावावर शेती दाखवण्यात आली.

शेतीत असलेल्या फळबागांची नोंदही सर्व्हेत नव्हती. शेतात दोन हजार मीटरची पाईपलाईन आहे, त्याचीही नोंद केली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 2019 मध्ये पाईपलाईनची नोंद केली तर सप्टेंबर 2020 मध्ये फळबागाची नोंद केली. आज त्यांचा शेतजमिनीवर समृद्धी मार्ग पूर्ण झाला आहे. परंतु अजूनपर्यंत शेताची मालकी डिगंबर शंकर मोरे यांचीच दाखवली आहे. तसेच शेतजमिनीचा मोबादलाही त्यांना मिळाला नाही.

नाशिक- पिंप्रीसदोचे काम अजून लांबच

नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हे अजून अधिकृतपणे सांगितले जात नाही. यामुळे नाशिक शहर समृद्धीला जोडणारा इगतपुरीजवळील पिंप्री सदो येथील कामाच्या अजून काहीच हालचाली नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्याच्या एमएसआरडीसीएलएफने सहा महिन्यापुर्वीच नाशिक ते पिंप्रीसदोच्या विद्यमान महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास मान्यता दिली होती. या दोन्ही महामार्गांच्या जोडणीच्या ठिकाणी तयार होणार्या जंक्शनवर पंधरा बाय साडेपाच मीटर आकाराचा डबल अंडपास मंजूर केला होता. या महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिककरांना आता अवघ्या अडीच तासांतच मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.

माहिती उपलब्ध नाही

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील काही भाग येत्या 1 मेपासून सुरु करण्याची तयारी शासनाने चालवली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या प्रश्नांमुळे काम थांबले आहे. नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होणार त्याची माहिती समृद्धीच्या विभागाकडून प्राप्त झाली नाही.ज्या शेतकर्यांच्या शेतात अजूनही काम सुरु नाही तेथील परिस्थितीचीही माहिती मिळाली नाही.

लवादातील प्रकरणांसाठी वाढीव मोबदला

नाशिक व नगर जिल्ह्यातील 32 प्रकरणे लवादाकडे प्रलंबित आहेत. या शेतकर्यांना 25 टक्के वाढीव मोबदल्याचा लाभ देण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला. ज्या शेतकर्यांनी संमती दिली नाही परंतु त्यांच्या जमिनी नवीन भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या आहेत, त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

सातबारा अजून माझ्याच नावावर

माझ्या शेतात महामार्ग तयार झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी मी सातबारा उतारा काढला. त्यात जमिनीचा मालक अजून मलाच दाखवले आहे. तसेच मला अद्याप मोबदलाही मिळाला नाही किंवा माझा मोबदला न्यायालयातही जमा केलेला नाही.

डिगंबर मोरे, शेतकरी, वर्दडी