
मुंबई | Mumbai
देशभरासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला (Rain) सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील (Maharashtra) मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. महाराष्ट्रात यंदा काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही ठिकाणी जास्त पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुढील ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे...
याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असून राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय आज मुंबई, पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मुंबईच्या (Mumbai) काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच यंदा देशात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. तर राज्यात सरासरीच्या ९७ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड या ९ जिल्ह्यांमध्ये (Districts) पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ठिकठीकाणी पावसाने दमदार हजेरी लावली होती. या संपूर्ण महिनाभर राज्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर आता मान्सून माघारी फिरणार असल्याने मुंबईसह राज्यात आठवडाभर विजांच्या कडकडाटासह (lightning) मुसळधार पाऊस बरसेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.