
मुंबई | Mumbai
दहा दिवसांपूर्वी म्हणजेच गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) राज्यात सगळीकडे गणपती बाप्पांचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज गुरुवार (दि.२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) गणपती बाप्पांचे विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असतानाच आता मुंबईसह विविध भागांत पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे...
हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ४ तासांत मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे शहरालगतच्या परिसरात उंच ढगांची निर्मिती होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कमी वेळात जास्त पाऊस (Rain) होण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणपासून मराठवाड्यापर्यंत वादळी पावसाचे क्षेत्र सक्रिय आहे.
दरम्यान, आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मंडळाकडून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. मात्र, अचानक काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबईत (Mumbai) सध्या जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, भर पावसातही लोकांमधील उत्साह कमी झालेला नसून मोठ्या प्रमाणावर लोक मिरवणुका पाहण्यात दंग आहेत.