यमुनेच्या कवेत राजधानी

अनेक भाग जलमय
यमुनेच्या कवेत राजधानी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी सकाळी 7 वाजता 208.46 मीटरवर पोहोचली. हे धोक्याचे चिन्ह 205 मीटरपेक्षा 3 मीटर जास्त आहे. राजधानीच्या वजिराबाद येथील सिग्नेचर ब्रिजजवळील गढी मांडू गाव पाण्यात बुडाले. यमुना नदीच्या काठावर असलेल्या सखल भागातून 16,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.दरम्यान,केंद्रीय जल आयोगाने सांगितले की, दिल्लीत यमुना नदीतील पाण्याची पातळी स्थिर झाली असून शुक्रवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ती 208.45 मीटरपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हरियाणातील हथनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यमुना वजिराबाद ते ओखला 22 किमी अंतरावर आहे. गुरुवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी 209 मीटरपर्यंत पोहोचल्यावर बहुतांश भाग पाण्याखाली जाण्याची भीती केंद्रीय जल आयोगाला आहे. एनडीआरएफच्या 16 तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. 2,700 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या पूरस्थितीमुळे दिल्लीतील काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यमुना बँक मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. तसेच लाल किल्ला, शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक जलशुद्धीकरण केंद्रे बंद करावी लागली.

हरियाणामध्येही यमुनेचे पाणी 13 जिल्ह्यांमध्ये दाखल झाले आहे. 240 गावे पुराच्या तडाख्यात आली आहेत. हळुहळू यमुनेचे पाणी आता आणखी वाढत आहे, त्यामुळे आज जिंद, फतेहाबाद, फरीदाबाद, पलवल आणि सिरसा या पाच जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान 2,000 पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे.

पुरानंतर पाण्याचे संकट

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com