पहिल्याच पावसात 'स्मार्ट' कामांची पोलखोल; दही पुलानजीक चार फुटापर्यंत पाणी

पहिल्याच पावसात 'स्मार्ट' कामांची पोलखोल; दही पुलानजीक चार फुटापर्यंत पाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मोठा गाजावाजा करून नाशिक शहरात केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवात झाली होती. यामध्ये प्रामुख्याने दहीपुलावरील कामे चर्चेत आली होती. याठिकाणी महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने मार्ग बनविण्यात आले असा आरोप केला जात होता. तरी स्मार्ट सिटीने असा दावा केला होता की, या ठिकाणी दर पावसाळ्यात जो पाणी साचतो ते साचणार नाही. मात्र, आज दुपारनंतर आलेल्या धुवाधार पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल झाली. याठिकाणी सुमारे चार फुटापर्यंत पाणी साचले होते.....

अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली तर हळूहळू पावसाने जोर धरला होता. दुपारी चार वाजेच्या दरम्यान तर दहीपूल परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते तर अर्ध्या तासातच पाणी चार फुटापर्यंत जमा झाले होते.

यामुळे याठिकाणी असलेल्या अनेक दुकानांमध्ये पुन्हा पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या देखील पाण्यात बुडाले होते.

याठिकाणी सार्वजनिक शौचालय असून तेथील घाण पाणीदेखील संपूर्ण परिसरात पसरले होते. कोट्यावधी रुपये खर्च करून हा नवीन मार्ग तयार केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेण्यात आले नाही असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता.

हा वाद खूप वाढला होता, सदर मार्ग शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम तसेच गरुड रथाचा मार्ग असल्यामुळे देखील भाविकांनी मार्ग छोटा केल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती, मात्र, त्याची मोजमाप केल्यानंतर तो मार्ग रथ जाण्याइतका असल्याचे लक्षात आल्यानंतर तो वाद थांबला होता. मात्र, पाणी साचणार नाही असा दावा देखील स्मार्ट सिटीने केला होता तो दावा आज खोडून निघाला.

दरम्यान स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना दही पुलावर पाणी साचण्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित दहीपूल परिसराची अधिकाऱ्यांसह पाहणी केली तसेच महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याशी चर्चा केली.

स्मार्ट सिटीच्या वतीने दहीपुल परिसरात पाणी साचणार नाही यासाठी विशेष नियोजन केले आहे. दहीपुलावरील काम पूर्ण झाले असले तरी अद्याप संपूर्ण काम झालेले नाही. पुढे अद्याप काम सुरू आहे. आम्ही वरून पाणी येणार नाही या दृष्टीने काम करीत आहोत, वरचे पाणी डायव्हर्ट झाल्यास दही पुलावर पाणी साचणार नाही.

सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com