
नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी ( Heavy Rain )व सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. याकाळातील नुकसानीपोटी शेतकर्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, आता पावसाळा संंपून दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीदेखील नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी अजूनही भरपाई अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
अतिवृष्टी व सततच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 455 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला. यात 2 लाख 77 हजार 694 शेतकर्यांकरता भरपाईसाठी प्रशासनाने 241 कोटी 18 लाख 18 हजारांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पावसाबरोबरच सततच्या पावसाने अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पाऊस झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला(Crop Damges ).
यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. यात मका, सोयाबीन, भात, भुईमूग, कापूस, कांदा, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, चिकू, बाजरी, तूर यासह अन्य पिकांना फटका बसला.यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीसाठी 241 कोटींहून अधिक रकमेची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून केवळ मदतीची घोषणाच झाली असून शेतकर्यांना प्रत्यक्षात हाती काहीच पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.