
मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. त्यानंतर आता वाढत्या उन्हामुळे नागरीक हैराण होऊ लागले असून राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस उन्हाची (Summer) तीव्रता वाढणार आहे. त्यानुसार राज्यात १४ मे पर्यंत उष्णता वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तविण्यात आला असून कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहणार आहे.
तर राज्यातील जळगावात सर्वाधिक तापमान असून याठिकाणी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, नागपूर, या शहरांच्या तापमानात वाढ झाली असून याठिकाणचे तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
उष्णघातापासून काळजी कशी घ्याल?
उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्यायला हवे. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.