
मुंबई | नवी दिल्ली । वृत्तसंस्था Mumbai | New Delhi
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयत सुनावणी होणार आहे. संत्तासंघर्षाचे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करावे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने गेल्या सुनावणीवेळी केली होती. त्याबाबतही या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षाचे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का वर्ग करावे? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांकडे लेखी स्वरुपात उत्तर मागितले होते. त्यानुसार ठाकरे गटाने लेखी स्वरुपात उत्तर न्यायालयात सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारच्या सुनावणीत त्याबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सत्तासंघर्ष प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाकडे सुरू आहे. 10 जानेवारीच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कदाचित 7 सदस्यीय घटनापीठाचा विषय मांडतील. त्यावेळी न्यायालय काय निर्णय घेते याची उत्सुकता आहे. सत्तासंघर्षाचे प्रकरण न्यायालयाकडून लिस्ट करण्यात आले आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे त्यावर सुनावणी होणार आहे. शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा लागू होणार? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? 16 अपात्र आमदार या प्रमुख मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगातही सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात सत्तासघर्षाची सुनावणी होत असताना चालू आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगातही शिवसेनेतील संघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. येत्या 12 जानेवारीपासून ही सुनावणी सुरु होत आहे. या सुनावणीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीला जाणार आहेत.
शिंदे, ठाकरे एका व्यासपीठावर?
सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकदाही एकत्र आलेले नाहीत. येत्या 23 जानेवारीला ते एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण या दिवशी होणार आहे. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण देण्यात आले आहे.