प्रत्येक व्यक्ती पर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणार

आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी थेट दिल्लीतून ‘देशदूत’ला दिलेली खास मुलाखत
प्रत्येक व्यक्ती पर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणार

नाशिक । विजय गिते Nashik

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत देशाच्या आरोग्य खात्याच्या मंत्री झालेल्या डॉ.भारती प्रवीण पवार ( Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारत त्यांनी नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. या नव्या जबाबदारीबद्दल त्यांच्याशी ‘देशदूत’ ने साधलेला हा संवाद.

नवीन जबाबदारी आपण स्वीकारत असतानाच नाशिकला आपल्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच एवढे मोठे स्थान मिळाले आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते ?

हा खूप आनंदाचा क्षण असून जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या माध्यमातून अनेक कामे केली आणि आता मला याच खात्याची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे याचा आनंद वाटतो. दिंडोरी मतदार संघ,नाशिक जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी या पदापर्यंत पोहोचले आहे.

सातत्याने सात वर्षांपासून विकसनशीलतेच्या वाटेने नेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी,ना.अमित शहा, ना.नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या मार्गदर्शनाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. करोना काळात सर्वांचे आरोग्य चांगले राहावे ,असे काम करायचे आहे . म्हणूनच ही मोठी जबाबदारी डॉक्टर म्हणून मला मिळालेली आहे,असे मी मानते.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी मिळाली असून हा आदिवासी बांधवांचा मोठा गौरव आहे . महिला सक्षमीकरण याबद्दल केवळ न बोलता आम्हा सात महिलांना मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधानांनी आम्हा महिलांवर ही मोठी जबाबदारी टाकली आहे .

आपण पेशाने डॉक्टर आहात. आरोग्य आणि त्यातल्या त्यात कुपोषणावर काम करण्यात आपल्याला अधिक रस आहे आणि याच खात्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. या विषयावर आपली पुढील वाटचाल कशी राहील ?

आरोग्यावर सातत्याने काम केले आहे. देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील आणि त्याचे आरोग्य उत्तम, चांगले राहील हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न असून स्वच्छ भारत अंतर्गत अनेक योजना ते राबवत आहेत. या योजना ग्रामीण भागात पोहोचत आहेत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑक्सीजन सिलेंडर त्याचे प्लांट पोहोचण्यासाठी आव्हाने होती.ती प्रत्येक वेळी केंद्र शासनाने चांगली मदत केल्याने राज्यात सुरक्षितपणे पोहचली गेली आहे. यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यावर माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे.

खासदार म्हणून आपली ही पहिली टर्म. दोन वर्षांच्या काळातील आपल्या कामगिरीमुळे आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे. हा अनुभव आपल्याला किती उपयोगी पडेल?

चांगले काम करावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मला माझ्या माणसांनी निवडून दिले आहे.त्यांच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत अशा सुविधांसाठी मी झटून काम करणार आहे.नाशिक दिंडोरीतून मला पहिली खासदार म्हणून माझ्या जनतेने मला निवडून दिले आहे. माझे सासरे स्वर्गीय ए टी पवार हे सातत्याने सांगत होते, ' लोकांच्या समस्यांवर काम करा ' हीच शिकवण घेऊन मी पुढे जात आहे. आता करोना काळात भाजपने रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली आहे.प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याची आमच्या पक्षाची पद्धत आहे. आत्मीयतेने काम केले तर सोयीचे होते, हे यातून स्पष्ट झाले आहे. आदिवासी भागात छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात याची जाणीव आपल्याला असल्याने त्यांच्यासाठी मी सातत्याने काम करत आहे.

आपण महिलांसाठी काय संदेश देणार?

मला मंत्रिपद देऊन हा मान म्हणजे महिलांसाठी मोठा गौरव आहे.केंद्रीय मंत्रिमंडळात सात महिलांना मंत्री करत पक्षाने आम्हा सर्वांना मोठा मान दिला आहे. महिलांसाठी सतत काम करायचे आहे हा आमचा सर्वांचा माणस आहे. आमच्या भाजप पक्षात महिलांना नेहमीच संधी दिल्या जातात, हेच आम्हा महिलांसाठी प्रेरणादायी आहे. महिलांसाठी अनेक योजना केंद्र शासन राबवत असून त्यामध्ये महिला सुरक्षा, टॉयलेट अशा मूलभूत गरजा विषयी पंतप्रधान मोदी तर सातत्याने प्रयत्नशील आहेत . आम्हा महिलांना असे पंतप्रधान मिळाले आहेत. याचा महिला म्हणून मला वैयक्तिक मोठा अभिमान वाटतो .

नाशिक मध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाशिवाय काही आले नाही. त्यामुळे आपल्या खात्याच्या माध्यमातून आपला काय करण्याचा मानस आहे?

आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. नाशिकमध्ये एका मोठ्या हॉस्पिटल साठी माझा प्रयत्न राहणार असून तो आता मार्गीही लागत आला आहे.या बरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी मोठे हॉस्पीटल असावे ,असा माझा यापुढे प्रयत्न राहील.

नाशिककरांसाठी विविध गोष्टी करण्याचा माझा निश्चितच मानस राहील. माझ्या दिंडोरी मतदार संघातील आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी निश्चितपणे सार्थ करून दाखविल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com